अहिल्यानगर शहरात रविवारी धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुर्गामाता दौड दरम्यान काढलेल्या एका आक्षेपार्ह रांगोळीवरून वाद निर्माण होऊन आंदोलन, रास्तारोको आणि पोलिस लाठीचार्जापर्यंत प्रकरण गेलं. यामुळे संपूर्ण शहरात तणावाचं सावट आहे.
नेमकं प्रकरण काय?
दुर्गामाता दौड दरम्यान काढलेल्या रांगोळीत “I Love मोहम्मद” असा मजकूर आढळल्याने संताप उसळला. यावरून मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केलं. आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पोलिसांचा हस्तक्षेप
आंदोलनादरम्यान जमाव संतप्त होऊन शहराकडे कूच करू लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करत लाठीचार्ज केला.👉 कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले –”आक्षेपार्ह रांगोळी काढणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र जमाव शहराकडे कूच करत असल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहता लाठीचार्ज करावा लागला.”
राजकीय आरोप-प्रत्यारोप
आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत सांगितलं –
दुर्गामाता दौड दरम्यान समाजकंटकांनी मांसाहाराची हाडं रस्त्यावर टाकली होती. तसेच ‘I Love मोहम्मद’ हे बोर्ड दाखवून जाणूनबुजून भडकविण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपीला अटक झाल्यानंतरही रास्तारोको आंदोलन करणे चुकीचे आहे.”
शहरात तणाव, पोलिस बंदोबस्त कडक
या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये भीतीचं वातावरण असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.
एका रांगोळीवरून सुरू झालेला वाद संपूर्ण शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनला. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण आहे.






