मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या नव्या लोकायुक्तपदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे त्यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेला न्यायव्यवस्थेतील अनुभवी व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व मिळाले आहे. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्या. शुक्रे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पाच वर्षांचा कार्यकाळ
नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत करण्यात आली आहे.
लोकायुक्त संस्था ही प्रशासनातील भ्रष्टाचार, गैरप्रशासन आणि सार्वजनिक पदाधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींच्या चौकशीच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे न्या. शुक्रे यांच्या नियुक्तीकडे राज्यातील प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा न्यायिक अनुभव
सुनील शुक्रे यांनी 2000 मध्ये थेट जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायिक सेवेत प्रवेश केला. त्यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश, नागपूर खंडपीठाचे रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमीचे संयुक्त संचालक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
13 मे 2013 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2023 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून निवृत्त झाले.
शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती
न्या. सुनील शुक्रे यांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, माजी लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच लोकायुक्त संस्थेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी न्या. सुनील शुक्रे यांच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














